World Liver Day -19th April 2023
19 एप्रिल हा जगामध्ये सगळीकडे जागतिक यकृत दिन म्हणून पाळला जातो. या यकृत दिनाच्या निमित्ताने पुण्यामध्ये काही कार्यक्रम करता येईल का याबाबत फेडरेशनची उत्साही कार्यकर्ती सौ. संगीता नायक हिचे बरोबर फोनवर चर्चा झाली होती. तिने स्वतः यकृत दान केले आहे त्यामुळे हा विषय तिच्या जिव्हाळ्याचा विषय आहे.
तिने उत्साहाने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या व्यवस्थापनाशी चर्चा करून त्यांच्या सहकार्याने काही कार्यक्रम करता येईल का याचे नियोजन करण्यास सुरुवात केली होती. रुग्णालयाचे उत्साही व्यवस्थापक डॉ पळनिटकर यांनी त्यात उत्साहाने लक्ष घालून त्या नियोजनाबाबत एक मीटिंग आयोजित केली. फेडरेशनचे सचिव श्री श्रीकांत कुलकर्णी व सहसचिव श्री प्रशांत पागनीस यांनी त्यात उत्साहाने भाग घेतला. इंडियन मेडिकल असोसिएशन पुणे यांचे फेडरेशन बरोबरचे मैत्र पाच वर्षांपूर्वीपासूनचे आहे. त्यामुळे फेडरेशन, मंगेशकर रुग्णालय व आय एम ए यांच्या संयुक्त विद्यमाने यकृत दिनाच्या निमित्ताने काही कार्यक्रम आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले. एखाद्या सभागृहामध्ये मर्यादित व्यक्तींसमोर कार्यक्रम घेण्यापेक्षा समाजावर प्रभाव पाडू शकेल अशा पद्धतीने एखादा मोठा चांगला कार्यक्रम करावा या दृष्टीने चर्चा करून यकृत दिनाच्या निमित्ताने त्यापूर्वीच्या रविवारी वॉकॅथॉन व मिनी मॅरेथॉन आयोजित करावी असे निश्चित करण्यात आले. आणि सर्व संबंधित संस्थांचे कार्यकर्ते उत्साहाने कामाला लागले.
रविवार दिनांक १६ एप्रिल २०२३ रोजी… जागतिक यकृत दिनानिमित्त, केशवबाग, राजाराम पुलाजवळ, पुणे येथे,
सदर कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते.
दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, द फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन आणि इंडियन मेडिकल असोसिएशन पुणे या संस्थांच्या उत्साही कार्यकर्त्यांबरोबरच अनेक पुणेकर नागरिक उत्साहाने यात सामील झाले होते जवळपास १२०० पेक्षा जास्त व्यक्ती भल्या पहाटे पाच साडेपाचच्या दरम्यान कार्यक्रम स्थळी पोहोचल्या होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात ५ किमी आणि ८ किमी वॉकथॉन/मॅरेथॉनने झाली.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने अतिशय काटेकोरपणे कार्यक्रमाची व्यवस्था केली होती.
त्यानंतर श्रीफळ व प्रमाणपत्र वितरणासह पदक प्रदान करण्यात आले. यासाठी डॉ. सचिन पळणीटकर यांनी परिश्रम घेतले होते.
सकाळी 7.30 वाजता, डॉ. भक्ती दातार आणि डॉ. समीर दातार यांच्या अवयवदानावरील गाण्यांचा कार्यक्रम झाला. दोन समीर दातार रचित नेत्रदानाचे मनाचे श्लोक व गाणे व फेडरेशनचे उपाध्यक्ष सुनील देशपांडे यांनी लिहिलेला अवयव दानाचा अभंग डॉ भक्ती दातार यांनी अत्यंत सुरेल आवाजात सादर करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. संत ज्ञानेश्वर नर्सिंग कॉलेजच्या नर्सिंग विद्यार्थिनींनी एक अतिशय मनोरंजक पथनाट्य स्किट सादर केले.
श्री मुकुंद जोगळेकर यांनी सुनील देशपांडे रचित कार्यकर्त्यांचे स्फूर्ती गीत सादर करून कार्यक्रमामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण केले.
त्यानंतर मुख्य कार्यक्रमासाठी व्यासपीठावर निमंत्रित मान्यवरांना पाचारण करण्यात आले. मंचावर सन्माननीय डॉ.धनंजय केळकर (संचालक दीनानाथ मंगेशकर रुग्णालय), श्री व सौ जावडेकर, श्री गुजराथी, ( यकृत दाते व भोक्ते) डॉ. राजू वरियानी, डॉ. अरुण हळबे, डॉ. आरती निमकर, डॉ. मीनाक्षी देशपांडे (इंडियन मेडिकल असोसिएशन तर्फे) आणि श्री सुनील देशपांडे ( उपाध्यक्ष, दि फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन) हे होते. दोन तरुण यकृत प्राप्तकर्त्यांनी दीप प्रज्वलन केले.
यानंतर यकृत दान करणाऱ्यांचा सत्कार आणि त्यांचे अनुभव कथन झाले. यकृत दानाचे महत्त्व याविषयी विविध मान्यवरांची मनोगते झाली . इंडियन मेडिकल असोसिएशन पुणे यांचे तर्फे एका पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. कलाकार आणि मान्यवरांचा सत्कार झाला.
सूत्रसंचालकाकडून अनवधानाने श्री सुनील देशपांडे यांचा उल्लेख डॉक्टर म्हणून करण्यात आला. ते सूत्र पकडून सुनील देशपांडे यांनी सांगितले
“मी डॉक्टर नाही. तसेच आमच्या फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांपैकीही कुणीही डॉक्टर नाही. या क्षेत्राशी संबंधित नसूनही यामध्ये कार्य करण्यासाठी एका दृढ भावनेने एकत्र आलेले कार्यकर्ते, यांनी ही फेडरेशन स्थापन करून पुढे आणली. आपण डॉक्टर मंडळी अवयव दानाच्या मंदिरातील पुजारी असाल, पण आम्ही या मंदिराच्या पायरीचे कार्यकर्ते आहोत. दाते आणि भोक्ते यांना या पायरीपर्यंत आणून सोडण्याचे काम अर्थात जनजागृतीचे काम करणे हेच कार्य आम्ही करत असतो. डॉक्टरांनी त्यांचा जास्तीत जास्त वेळ यशस्वी अवयव प्रत्यारोपणाच्या कार्यामध्ये द्यावा. निरपेक्षपणे व निरलसपणे आम्ही समाज प्रबोधनाचे कार्य करीत आहोत. तुम्ही जेव्हा एखादे ऑपरेशन यशस्वी करता त्या वेळेला आम्ही एकमेकांना उत्साहाने ते संदेश पाठवून आनंद व्यक्त करीत असतो. अशा या आत्मानंदासाठी कार्य करून आपणा सर्व डॉक्टर मंडळीना सहाय्यभूत होत असतो. यावर्षी आपल्या देशामध्ये 42 हजार 800 अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाल्या. जरी त्यातल्या 30000 या जिवंतपणीच्या असल्या तरी सुमारे 12800 या मृतदेहाकडून उपलब्ध झालेल्या अवयवांच्या होत्या हे विसरून चालणार नाही. हे खूप मोठे यश आपल्या सर्वांचे आहे. जगामध्ये सर्वाधिक अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया मागील वर्षी आपल्या देशात झाल्या ही आपणा सर्वांच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे.”
एकूणच अनेक संवाद आणि अवयव दाना संबंधीच्या चर्चात्मक देवाणघेवाणीसह एक अतिशय यशस्वी जनजागृती कार्यक्रमपार पडला.
दि फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन द्वारे ऑनलाइन पोस्टर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये 115 हून अधिक प्रवेशिका आल्या होत्या. एलईडी स्क्रीनवर सर्वांना एकापाठोपाठ एक पाहण्यासाठी उपलब्ध होत्या. परीक्षकांनी घोषित केलेल्या विजयी स्पर्धकांची नावे आणि बक्षिसे जाहीर करण्यात आली.
400 हून अधिक व्यक्ती शेवटपर्यंत उपस्थित होत्या.
अशा यशस्वी कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत फेडरेशनचे पुणे येथील कार्यकर्ते, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे कर्मचारी आणि इंडियन मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी यांच्या प्रयत्नातून एक चांगला कार्यक्रम साकार झाला असे पुणेकर नागरिक कुजबुजत होते.